समुद्राच्या किनाय्रावर गार वारा केसांशी खेळत तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. खडकावर उभी राहून स्वतःला सांभाळताना तिच्या प्रेमीचे अदृश्य हात तिला आकाशाकडे साद घालत होते. मागुन ऐकू येणारा वाद्यांचा कर्कश आवाज कानात घुमत तिच्या पायांमधे थरथर निर्माण करत होता. किनाय्राला लागून असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटा आदळत होत्या. मग तिची नजर ओळीत ठेवलेल्या दगडी शवपेट्यांवर गेली. प्रत्येक शवपेटी तिच्या मालकाची वाट पहात होती. मागून एकू येणाय्रा वाद्याचें सुर बदलले. अथांग समुद्राकडे पाठ करून ती तिच्या पतिच्या निर्जिव पार्थिव देह उचललेल्या सेवकांमागे चालू लागली.
अल्पवयात विधवा होणे हे तिच्या नशिबातच होते. तिच्या डोळ्यांमधुन अश्रु ओघळताना त्याच कारण तिला देखिल समजत नव्हते की नक्की ती कोणासाठी रडतेय.....त्याच्यासाठी का स्वतःसाठी.... हा दिवस कधी-ना-कधी उगवणारच, याची तिला पुर्ण कल्पना होती. ज्या दिवशी तिचा विवाह झाला त्याच्याही पुर्वीपासून. सगळ्या घटना जणू कालच घडून गेल्यासारख्या वाटत होत्या. आकाश आणि समुद्राच्या साक्षीने झालेला त्यांचा विवाह,... वाद्याच्या आवाजासोबत जल्लोश करणारे लोक,... रात्रीच्या वेळी अग्नीच्या प्रकाशात रेशमी पडद्या मागून पहिल्यांदा बघितलेला त्याचा तेजस्वी चेहरा,... त्याने हाताने पडदा बाजूला सारल्यावर तिच्या चेहय्रावर उमललेले मंदस्मित,... त्या मधुर आठवणीनीं तिचा चेहरा पुन्हा आज उमलण्या आगोदरच वास्तवतेच्या अश्रुनीं तिच्या चेहय्रावर आपला हक्क प्रस्थापीत केला होता. आज पुन्हा एकदा तिच वाद्ये वाजत होती, पण एका वेगळ्याच सुरात.
आत प्रवेश करताच ती भानावर आली. तिच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी सोबत कोणीही नव्हत. तिच्या वृध्दापकाळी साथ देण्यासाठी आता तिचा राजा राहिला नव्हता. त्याच तरुणपण तर त्याने केव्हाच भोगलं होत, आता तिचं तरुणपण तिने त्याला अर्पण करायच होत. त्याचे कर्तव्य त्याने पार पाडले होते, आता कर्तव्य पालन तिला करायच होत. परंपरेनुसार एका राजाची पत्नी होण्याची किंमत तिला द्यावी लागणार होती.
शवपेटीवर फुले अर्पण करणाय्रा लोकांकडे निर्वीकार चेहय्राने पहाताना तिला प्रश्न पडला कि तिच्यासाठी देखील हे लोक असच काही करतील का?.. अखेरची पाकळी थडग्यावर चढवून झाल्यावर पुन्हा एकदा वाद्यांची लय बदलली. तिचे पाय थरथरत होते, पण तरिही मन घट्ट करून ती स्थिर उभी होती. मातीने माखलेल्या काही मळकट हातानीं तिला आकाशात उचं उचलून धरले आणि पुढे काही पावले चालून तिच्या श्वेत वस्त्रांवर डाग सोडत तिला खाली ठेवले.
शांतपणे तिने समुद्राच्या गार हवेचा शेवटचा श्वास शरिरात भरून घेतला..... शेवटचेच, एकदा आकाशात चमकणाय्रा ताय्रानां डोळ्यांमधे भरून घेतले.....आणि वरून सरकणाय्रा दगडी फरशीने तिच्या पापण्या बंद केल्या.
-समाप्त
२ टिप्पण्या:
प्रथमच भेट देत आहे तुझ्या ब्लॉगला आणि एक मस्त लेख वाचायला मिळाला याचा आनंद आहे.
तुझी शब्दरचना खूपच चांगली आहे असेच लिहित रहा :)
विक्रम, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल Thanks..
टिप्पणी पोस्ट करा